Ad will apear here
Next
सांगली, कोल्हापूरच्या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


कराड :
‘सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात आलेल्या पुरामुळे प्रचंड हानी झाली. त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निर्णय घेतले आहेतच; पण अधिक पाऊस झाल्यानंतर नद्यांमधून वाहून जाणारे जास्तीचे पाणी दुष्काळी भागात वळवणे आणि पूर आला तरी रस्ते वाहतूक, वीजपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कायम चालू राहण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे असे दुहेरी उपाय करून पुराच्या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची दीर्घकालीन योजना राज्य सरकार आखत आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, १६ सप्टेंबर रोजी कराड येथे सांगितले.
 
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती उदयनराजे, यात्राप्रमुख व प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, प्रदेश सचिव अतुल भोसले, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक आणि राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित शिवाजीराव देशमुख यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.



मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागांत पूर आला. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्गासह विविध ठिकाणी प्रचंड मोठी हानी झाली. सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक सर्व निर्णय घेतले आहेत; पण सर्वांत महत्त्वाची बाब ही आहे, की पावसाचा कल बदलला आहे. सातशे टक्क्यांपर्यंत पाऊस पडला. हे ध्यानात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेची मदत घेतली आहे.’ 

ते म्हणाले, ‘जपानमध्ये सातत्याने पूर असतात; पण तेथे महापूर आल्यानंतर हानी होत नाही. अनेक देशांमध्ये जागतिक बँकेने अशा पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. त्या दृष्टीने जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेची २२ तज्ज्ञांची तुकडी नुकतीच येऊन गेली. त्यांनी अभ्यास केला. पुराच्या संकटापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी पायाभूत सुविधा कशा निर्माण करायच्या याची दीर्घकालीन योजना तयार करत आहोत. त्यासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक आर्थिक मदत करील आणि संपूर्ण तांत्रिक सहकार्य करील.’

‘या भागात पुरामुळे होणारी हानी रोखण्यासाठी दोन उपाय करण्यात येतील. या परिसरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि गावातले रस्ते, तसेच वीजपुरवठ्याच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा महापुरात कधीही बंद कराव्या लागणार नाहीत अशा पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत. पुराचा धोका ध्यानात घेऊन घरांची रचना करावी लागेल. त्याचबरोबर पुरामुळे नदीमध्ये जास्तीचे पाणी आले, की ते पाणी दुष्काळी भागात वळवणे हा आणखी एक उपाय आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा तसाच एक उपाय आहे. लवादाने मंजूर केलेल्या पाण्यापेक्षा हे जास्तीचे पाणी असल्याने आंतरराज्य पाणीवाटपावर परिणाम होत नाही. हे दोन उपाय केल्यानंतर पुन्हा असे संकट येणार नाही याची काळजी घेणारी योजना बनवत आहोत,’ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘भारतीय जनता पक्ष – शिवसेना महायुतीसंदर्भात आमचा संवाद नीट चालू असून, हा संवाद निष्कर्षापर्यंत जाईल आणि आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZUWCE
Similar Posts
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली : पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नाशिक : ‘गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर, प्रगतिशील आणि राज्याला समर्पित असे सरकार चालवून महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. फडणवीस सरकारचे प्रगतिपुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या उत्थानाची कहाणी आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये जाहीर सभेत केले
मृत तळ्याला बालगोपाळांकडून नवसंजीवनी; हजारो लिटर पाणी साठणार हणबरवाडी (मसूर, ता. कराड, जि. सातारा) : दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी जलसाठ्यांना नवसंजीवनी देणे हा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय असतो. हणबरवाडीतील सिद्धनाथ शेडगे या तरुणाने बालगोपाळांच्या साह्याने असाच उपक्रम राबविला आहे. गावाबाहेर, पश्चिमेला असलेल्या थारोबाच्या डोंगराच्या पठारावर असलेल्या एका
‘महाराष्ट्रात दोन वर्षांत कोणीही बेघर असणार नाही’ अकोले (अहमदनगर) : ‘महाराष्ट्रात बेघर असलेल्या सर्वांना घरे देण्याचे काम वेगाने चालू असून, २०२१पर्यंत राज्यातील कोणीही बेघर असणार नाही. प्रत्येक गरिबाला राहायला घर मिळेल,’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ सप्टेंबर रोजी व्यक्त केला.
सदाभाऊ खोत घेणार कराड दक्षिण मतदारसंघ दत्तक कराड (सातारा) : ‘कराड दक्षिण मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, पुलांचे बांधकाम अशा विकासकामांसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी आणि या भागाला भरघोस निधी मिळून येथील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी मी कराड दक्षिण

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language